#lifearoundher 1

त्या रात्री माझ्या नशीबी दोन ‘चंद्र’ आले,
एकाने समोरच्या अथांग सागराला उधाण आणलं होतं,
तर दुसऱ्याने माझ्या मनाला!

#lifearounder

Advertisements

Give Blood.. Share Life…

unnamed (3)

आज १४ जून..
दिनविशेष लक्षात राहण्यासारखा नक्कीच नाहीये.
कारण फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, मदर्स-फादर्स डे पलीकडे सहजासहजी दिनविशेष माहीत असण थोडं दुर्मिळच.

आजच्या दिवशी एक वेगळी गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून सगळ्यांसोबत शेअर करतोय.
आज आहे “जागतिक रक्तदाता दिन” (World Blood Donor Day).

हा दिवस ऐच्छीक आणि कोणत्याही मोबदल्याविना रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसमागचा मुळ उद्देश जरी हा असला तरी हा दिवस रक्तदान आणि रक्ताशी संलग्न असलेल्या प्रत्येक घटकांच्या नियमित दानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी साजरा करणे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. जेणेकरून या जनजागृतीमधून अनेक गैरसमज दूर होऊन रक्ताची कमतरता भासणार नाही आणि गरजू रुग्णांना योग्य गुणवत्ता असलेलं, सुरक्षित कायमस्वरूपी रक्त उपलब्ध होऊ शकेल.

रक्तदानानंतर रक्तसंक्रमण केंद्रातुन संक्रमित केलेल्या रक्तातील घटकांमुळे वर्षागणिक हजारो रुग्णांचे जीव वाचतात. शेवटच्या घटकेला असलेल्या रुग्णांना तुम्ही दिलेल्या रक्तामुळे जीवनदान मिळु शकतं.

नैसर्गिक असो वा मानवनिर्मित अपघात, प्रसूतीकाळ असो किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात केल्या जाणाऱ्या केमोथेरपीज, थायसलमिया सारख्या कित्येक आजारांमध्ये रक्त आणि त्यातील घटक हे संजीवनीचं काम करत असतात.

गेले ९ वर्ष मी स्वतः वर्षातून दोन किंवा तीन वेळा नियमित रक्तदान करतो. या नैतिक अधिकाराने मला सगळ्यांना सांगावसं वाटतं निदान एकदा रक्तदान करून बघा. त्यावेळी तुम्हाला जे समाधान मिळेल ते मंदिरातल्या दानपेटीमध्ये १००/- ₹ नोट हळूच सारताना किंवा मंदिरामध्ये ५०१/- ₹ चा अभिषेक करताना पण वाटलं नसेल इतकं असेल.

गेल्या ३-४ महिन्यांपूर्वी, स्वच्छदी ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये गेलो असताना, जनकल्याण रक्तपेढीच्या डॉक्टरांनी रक्तदान न करण्याचा एक सल्ला दिला. दोन मिनिट मी विचार करू लागलो डॉ. असून हे मला करू नका का सांगतायत? थोड्या वेळाने डॉक्टरांनी प्लेटलेट्स डोनेशनविषयी माहिती सांगितली. “खूप कमी रक्तदात्यांची व्हेन प्लेटलेट्स डोनेट करण्यास पात्र असते. व्हेन थोडी जाड असावी लागते. तुमची व्हेन सुटेबल आहे.”
मला ते सगळं नवीन असल्याने मी त्या विषयात खोलवर शंका विचारत गेलो.

तेव्हा कळलेल्या आणि आता पर्यंत माहीत नसलेल्या गोष्टी इथे मी सांगतो.
● प्लेटलेट्स हा रक्तातील एक घटक असतो.
● प्लेटलेट्स डोनेट करताना आपला प्लेटलेट्स काऊंट चेक केला जातो आणि तो पुरेसा असेल तर साधारण १ ते १.३० तास प्लेटलेट्स डोनेशनची प्रक्रिया चालते.
● ह्या वेळात शरीरातलं रक्त काढून त्यातल्या प्लेटलेट्स आणि प्लास्मा वेगळा केला जातो आणि उर्वरित रक्त पुन्हा त्याच मार्गे आपल्या शरीरात सोडलं जात.
● ही पूर्ण प्रकिया स्वयंचलित आणि सुरक्षित असते.
● एका प्लेटलेट्स डोनेशन नंतर ७२ तासांनी तुम्ही पुन्हा प्लेटलेट्स किंवा रक्त देऊ शकता.
● प्लेटलेट्स दानामुळे आपल्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होत नाहीत कारण खूप कमी प्रमाणांत त्या घेतल्या जातात तर डोनेशन नंतर काही वेळात त्या पुन्हा तयार होतात.
● ह्या प्रकियेत शून्य त्रास होतो.
● प्लेटलेट्स मध्ये रॅन्डम डोनर प्लेटलेट्स (RDP) आणि सिंगल डोनर प्लेटलेट्स (SDP) हे दोन प्रकार असतात.
● काही रुग्णांच्या केसमध्ये SDP चीचं गरज असते.

अशा सर्व नविन गोष्टी आणि बरेचसे गैरसमज दूर झाल्यानंतर मी अभिमानाने सांगतो, जनकल्याण रक्तपेढीचा मी नियमित प्लेटलेट्स डोनर आहे. गेले ४ महिने दरमहा एकदा जनकल्याण मधून फोन येतो आणि दुसऱ्या दिवशी प्लेटलेट्सची प्रोसिजर होते.

वरच्या सगळ्या अनुभवातून आणि जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधुन मला पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे, “कोणासाठीतरी उभे रहा, रक्तदान करा, रक्तदानाला प्रवृत्त करा आणि जीवनदान द्या.”

आपली संस्कृती सांगतेचं,
एकमेकां साहाय्य करू.. अवघे धरू सुपंथ…
चला तर मग रक्तदान करूया.. रक्तदानाला प्रवृत्त करूया आणि या निश्चयाचा अश्वमेध असाच दौडत ठेवुया…

#HappyWorldBloodDonorDay
#GiveBloodShareLife
#WBDD2018
#JankalyanBloodBank

 

Nostalgic Diaries #3 ‘बकुळीचं झाड’

IMG-20171223-WA0015जालगावांत बर्वे आळीच्या दुसऱ्या टोकाला माझं घर. साधारण बर्वे, दांडेकर, केळकर, सोहोनी अशा काहीशा आडनावांच्या बर्वे आळीत सारस्वताच आमचं एकमेव घर. बर्वे आळी संपते त्या टोकाच्या वळणावर नारायण तळ्याकडे जायच्या रस्त्यात मोक्याच्या जागी आमचं घर. माझा सगळ्यात आवडीचा विरंगुळा म्हणजे घरासमोर बसून रस्त्यावरच्या गाड्या बघणे.

आजोबांच्या हौशीमुळे घराच्या आवाराच्या बांधावर वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी फुलवल्या होत्या. घराजवळच्या वळणावर बाहेरच्या बाजूने एक बकुळीचं झाड होतं. आमच्या सगळ्या बहिणाबाईंची आवडीची जागा होती ती. मस्त धुक्याच्या सकाळी जमिनीवर पडलेला बकुळीचा सडा आणि त्यात दवबिंदुंनी टाकलेली भर हे समीकरण काही वेगळचं असायचं. फुललेलं बकुळीचं झाड सबंध आवार स्वतःच्या सुवासाने दरवळून टाकायचं. हल्ली, आणलेल्या फुलांचा हार करायचं म्हटलं तर डोक्यावर आठ्या पडणारा मी, मला आठवतंय बकुळीच्या त्या झाडाखाली आमचा कित्येक वेळ फुलं गोळा करण्यात जायचा कळायचं सुद्धा नाही. सागाच्या दोन हातात मावेल एवढ्या मोठ्या पानाचा द्रोण करून त्यात फुलं गोळा करता करता सकाळचं कोवळं ऊन निघून जायचं. गोळा केलेली फुलं नंतर एका मागोमाग एक धाग्यांमध्ये गुंफायची आणि तो बकुळीचा गजरा देवातल्या शांतादुर्गेच्या फोटोला घालायचा नाहीतर ताईबाईंच्या स्वाधीन करायचा हे समीकरण कायमचं पक्कं होतं. ह्या बकुळीच्या झाडाच्या आठवणी त्या काळापासून त्याच्या सुवासासारखेच मनात घर करून राहिले आहेत.

ह्याचं काहीशा संदर्भात, मला एका शब्दाचा वेगळा पण छानसाअर्थ उमगला आहे; तो म्हणजे ‘स्मृतीगंध’.. काही गंध आपल्या मनात कायमचे घर करून असतात, जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी त्या गंधाच्या अस्तित्वाने आपल्याला एखाद्या घटनेची स्थळाची किंवा अनुभवाची आठवण येते. माझ्या घराजवळचं ते ‘बकुळीचं झाड’ आणि त्याच्या आठवणी अशाच काहीशा आहेत. आज सुद्धा ऑफिसच्या पार्किंग मध्ये जातानाच्या रस्त्यावर दुतर्फा फुललेली बकुळीची कलम आहेत. रोज जाताना मला तो ‘स्मृतीगंध’ क्षणार्धात जुन्या आठवणींच्या फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो आणि दिवसाची सुरुवात सुखद होऊन जाते.

बकुळीच्या झाडावरच्या फुलांनी अजून एक गोष्ट मला शिकवली, “ज्याप्रमाणे फुललेलं बकुळीचं फुलं उंच झाडावरून पडलं तरीही त्याचा गंध आणि नाजुकता तशीच राहते, त्याचप्रमाणे आयुष्यात एका ‘पीक पॉईंट’ला असताना काही कारणाने मी घसरलोच तरीही, सक्षमपणे आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहायचं.”

बकुळीचं झाड.. स्मृतीगंधाचं पहिलं पुष्प..

….continued

चिन्या – We miss you!

चिन्या

‘उद्या दिवस फार गडबडीत जाणार असं दिसतंय !’
असं जेव्हा मी म्हणतो,
तेव्हा ते कमान करून
फार तर एखादा आळस देते….
अशावेळी अर्थातच मी चिडतो
आणि त्याच्यादेखत दुधाचा ग्लास तोंडाला लावतो !
पण ते दुर्लक्ष करते आणि डोळे मिटते;
कुणीतरी त्याला दूध दिलेले असते किंवा देणार असते –
आणि याची पक्की खात्री असल्यासारखा त्याचा चेहरा निर्विकार असतो !
अशा वेळेला त्याचा चेहरा
रेल्वेतल्या ‘विदाऊट तिकीट’ साधूंशी खूप जुळतो !!
पण मांजराला हेही कळत नाही…….

घरातले सगळे सकाळी पांगायला लागतात
तेव्हा ते फ्लॉवरपॉटसारखे स्तब्ध बसून असते…
‘कशासाठी…पोटासाठी’ असं म्हणत म्हणत
सगळे घामट चेहऱ्यावर पावडर थापू लागतात
तेव्हा ते एकदाच ‘म्यांव’ करते;
दुपारी फक्त एकदाच ‘इडियट्स !’ असं म्हणून
ते ताणून देत असणार !! 

थकलेल्या संध्याकाळी कुणीतरी
‘ आज बॉसला किंवा टीचरला कसा मस्का मारला ‘
हे सांगत असते
तेव्हा नेमके तेही
संध्याकाळच्या दुधासाठी
प्रत्येकाच्या पायाला घासत गोंडा घोळवत रहाते;
( मग अशा वेळी त्याला रागावताही येत नाही !) 

रात्री आम्ही झोपेत कण्हत असतो
तेव्हा ते हळूच उठते आणि
किल्ल्यावरून दरीतले स्वराज्य पहावे
तसे कपाटावर चढून आपल्या राज्याकडे पहात बसते !
अशा वेळेला त्याचे डोळे विलक्षण चमकू लागतात.
कारण ते चोरून चोरून आम्हाला पडणारी स्वप्ने पहात असते !
आम्हाला पडणारी स्वप्ने
आणि एकेका स्वप्नाबरोबर पांढरा होत चाललेला एकेक केससुद्धा !

(संदीप खरे यांच्या मौनांची भाषांतरे मधल्या मांजर कवितेतल्या काही ओळी)

     अगदी खरंय… कवी संदीप खरे म्हणतो, ते अगदी खरंय… मांजर असंच असतं. कोणाचं मनीमाऊ, कोणाची म्याऊ तर कोणाची मन्या.
हो आमची पण होती अशीच एक चिन्या. पांढरी शुभ्र रंगाची, हिरव्या-हिरव्या डोळ्यांची, चाणाक्ष, चतुर आणि तितकीच गुणी आमची चिन्या.

     माझी, ताईची, आई-बाबा आणि आज्जीचीसुद्धा सगळ्यात लाडकी मांजर. तशी मांजर, कुत्री, खारूताई, पोपट असे प्राणी पक्षी पाळून झालेत, पण चिन्या हे वेगळंच समीकरण होतं. मी शाळेत असताना पासून आमच्याकडे असलेलं हे ध्यान. सकाळी उठल्यावर पायात घुटमळायचं, कशासाठी? दुधासाठी अजून काय. हाच काय तो तिचा आवडता छंद. आणि हो, आम्हाला कुठेतरी, कसंतरी दुध चालायचं नाही हा. नेहमीच्या ताटलीत, गरम गरम वाफाळलेलं दुधचं हवं आम्हाला, भले ते पिताना जीभ भाजली तरी चालेल.  चुकून दुसऱ्या मांजराने त्यात तोंड घातलंच तर तेही वर्ज. तेव्हा सरळ निघून जाणे आम्ही पसंत करतो. असे आमच्या चिन्याचे दूध पितानाचे कारनामे. संध्याकाळी दूधवाला दादा यायच्या वेळेला चिन्याचं बस्तान घराच्या उंबरठ्यावर असायचं. जकात नाक्याचं काम आमची चिन्या उंबरठ्यावर बसून एकदम चोख करतं असे आणि बिल्डींगमध्ये दूध टाकून झालं की दादाच्या मागे मागे अगदी गेटपर्यंत तिचा गस्त रोजचा होता.

     चेहऱ्याने शिष्ठ पण गुणी चिन्याने बाकी सगळ्या मांजरांना चांगलं धाकात ठेवलं होतं. तिच्यासमोरून जायला किंवा ती बसली असेल तर तिच्या आजूबाजूला बसायला कोणाची हिंमत होत नसे.

     आमच्याकडच्या मांजरात चिन्या सगळ्यात जास्त लाडवलेली (आमच्या लाडाने थोडी शेफारलेली) होती. सोफ्याची सिंगल खुर्ची हे तिचं सिंहासन. कधी गारवा असेल तर आणि रोज सकाळी बसायचं ठिकाण म्हणजे फ्रिजचा स्टेबिलायझर आणि अगदीच अंगात आलं तर उड्या मारायची जागा म्हणजे शोकेसचा सगळ्यात वरचा कप्पा.

     शोभेचे हत्ती शोकेसच्या सगळ्यात वरच्या जागेवरून जमिनीवर पाडून फोडणे, देव्हाऱ्यातल्या देवांवरच्या किंवा जुड्या बांधत असताना दुर्वा खाणे, कधी कधी डोळा चुकवून ताटातला माश्याचा अख्खा तुकडा पळवणे, चिमण्या-खारूताई-कवडे मारणे हे चिन्याच्या नावावर असलेले फौजदारी गुन्हे. तिला माहित होतं की ह्यातले कुठलेही गुन्हे आपण केले तरी आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकतं नाही. साप मारून घरासमोर आणून टाकणे, पिल्लाना उंदीर आणून देणे, अख्या बिल्डींग मधले उंदीर पळवून लावणे, चोरी न करणे हे किताब पण चिन्याने पटकावले होते. त्याची बिरुदचं घेऊन मिरवत असे चिन्या नामक महाराणी.

     रात्री झोपताना अंथरूण घालणे हा खूप कंटाळवाणा कार्यक्रम असायचा पण चिन्या तिथेही रोज सर्कस करत असे. तुम्ही चादर जमिनीवर टेकवायची खोटी, चिन्या कुठूनतरी धावत येऊन विस्कटयाचं काम उत्तम करायची. चादर विस्कटणे, त्यात लपून राहणे हा रोजचा खेळ, मग कोणतरी उचलून घेतलं की अंथरूण घालून व्हायचं. नाहीतर तिच्या अंगात शैतान यायचा एवढं नक्की. आपण शांत झोपायची तयारी केली की ही बया कपाटावर आपल्या नेहमीच्या जागेवर जाणार आणि भर मध्यरात्री तिथून एक नजर टाकून झाली की हळू हळू शेरखानसारखी खाली येणार मग एक दिवस आईच्या पायाशी नाही तर एक दिवस बाबांच्या पायात अल्टरनेट कोणा न कोणाच्यातरी पायाशी ती येऊन झोपणार. सकाळी ५ वाजले की बाबा आणि चिन्याच्या गप्पा चालू आणि एकदा सकाळची वसुली (गरम गरम दूध) झाली की परत ताणून द्यायला चिन्या मोकळी. चिकन, मासे म्हणजे चिन्याचा जीव की प्राण त्याची तयारी करताना चिन्या आपला हिस्सा बरोबर मिळवायची. आम्ही पुण्याला शिकायला आल्यावर, घरी तिच्यासाठी म्हणून फक्त ह्या गोष्टी आणल्या जायच्या.

     आपल्या आयुष्यात प्रत्येक सुखदुःखात आपल्या घरची मंडळी आपल्या सोबत असतात, चिन्यापण त्या प्रत्येक गोष्टींची गेले १७ – १८ वर्ष साक्षीदार होती. माझ्या दहावीचा अभ्यास, परीक्षा, रिझल्ट सगळ्यात चिन्या माझ्यासोबत होती. दहावीनंतर पुण्याला आल्यावर चिन्या आणि माझी भेट तशी कमी होत गेली पण अगदी वर्षभरानंतर का होईना घरी गेलं की अगदी २ मिनिटांत आमची गट्टी व्हायची. अशी गुणी पण आगाऊ, शांत पण चिडकी, चतुर पण आळशी, चोरी न करणारी पण हावरट चिन्या.

We miss you a lot! 🙂

राऊ

index

राऊ

लेखक – ना. सं. इनामदार.

साहित्य प्रकार – ऐतिहासिक कादंबरी.

मुल्य – ₹ ४००/- मात्र.

     ना. सं. इनामदार यांची ही अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. मराठी साम्राज्याची भगवी पताका अटकेपार नेणारा एकमेव अपराजित, नीतिकुशल योद्धा अर्थात ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीची मोहिनी वाचकांच्या मराठी मनांवर आजतागायत कायम आहे. मराठी साम्राज्याची विजयपताका अबाधित राखणाऱ्या या    शूरवीराच जीवन एकूणच रोमहर्षक सोबतच त्यांचं कर्तृत्वही तितकंच निर्विवाद.

     प्रवाहाविरुद्ध निर्णय घेऊन ते निर्णय योग्य सिद्ध करण्याचे कसब असलेला हा एकमेव ‘पेशवा’. ऐन तारुण्यात वयाच्या एकतीसाव्या वर्षी त्यांच्या जीवनात एका असामान्य सौंदर्यवतीने प्रवेश केला. ही बावनकशी सोन्यालाही मागे टाकेल अशी सौंदर्यवती म्हणजेच ‘मस्तानी’. बाजीरावांच्या आयुष्यातला तीचा प्रवेश हा अनेक अनाकलनीय आणि विनाशकारी घटनांची नांदी ठरला. मस्तानीच्या येण्याने मराठी साम्राज्यात एक वादळ उठले परंतु ह्या वादळामुळे पेटलेल्या संघर्षातही त्यांच्या प्रेमाची ज्योत कायम राहिली. घरातील अंतर्गत कुरघोड्या, जातीने चित्पावन ब्राह्मण असूनही जुन्या पुराण्या चुकीच्या रितिरिवाजाला वेळोवेळी दर्शवलेला विरोध, परिणामी ब्राह्मणांकडून झालेली अवहेलना, यवनी-ब्राह्मणी संस्कृतीचे मनोमिलन, जात-पात-धर्म-पंथ ह्याचाही पलीकडे जाऊन जनतेच्या मनात घर केलेला हा ‘पेशवा’ असे अनेक चित्तथरारक प्रसंगांचे ह्या कादंबरीत वर्णन केलेले आहेत. अल्पायु असलेल्या ह्या योध्याने त्याच्या हयातीत एकही युद्ध हरेल नव्हते. ‘मस्तानी’ हेच सर्वस्व असलेला, असा मस्तानीचा हा ‘राऊ’ आपल्या प्रेमाचे नाव इतिहासात कायमस्वरूपी कोरून गेला. इतिहासाचा हाच धागा पकडून ना सं. इनामदार यांनी अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही कहाणी रंगविली आहे. कलात्मक सोय म्हणून काही गोष्टी गृहीत धरून मांडल्या आहेत. धर्मांच्या बंधनात न अडकणाऱ्या या प्रेमाची ही उत्कट कहाणी.

     एकदा वाचायला घेतली की थांबू नये असं वाटणाऱ्या काही कादंबऱ्या असतात, ही त्यातलीच एक कादंबरी आहे. इतिहासप्रेमी, खास करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना ‘दैवत’ मानत असाल तर ही कादंबरी वाचलीच पाहिजे.